
आमच्याबद्दल
३ जानेवारी २०२४ पासून आदर्श समाज घडवण्यासाठी समर्पित
आमची कथा
३ जानेवारी म्हणजे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका “क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले” यांची जयंती! त्यांच्या जयंतीनिमित्त '३ जानेवारी २०२४' रोजी “आशा फाउंडेशन, नवी मुंबई” ची स्थापना झाली.
सातारा जिल्ह्यातील 'लोणंद' या एका छोट्या गावातील ५ मुलींपासून सुरुवात करून सातारा व रायगड जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्था, शेकडो शाळा व महाविद्यालये आणि हजारो मुलींची सेवा 'आशा फाउंडेशन, नवी मुंबई' ने केली आहे.
आशा फाउंडेशन, नवी मुंबई ही एक अशी स्वयंसेवी संस्था आहे, जी पालकांच्या मायेचे छत्र नसलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी अखंड परिश्रम करते. समाजाचे मूळ असलेल्या स्त्रीला लहानपणीच शैक्षणिक, मानसिक, शारीरिक व सामाजिक साहाय्य करून त्यांना संधीची दारे उघडी करून देते.
आमचा विश्वास आहे की शिक्षण हे केवळ पुस्तकांबद्दल नाही, तर चारित्र्य, आत्मविश्वास आणि भविष्य घडवण्याबद्दल आहे. आमचे फाउंडेशन अशा मुलींवर लक्ष केंद्रित करते ज्या अनाथ आहेत किंवा एकल पालक असलेल्या कुटुंबातील आहेत, त्यांना भावनिक आणि भौतिक आधार प्रदान करतात ज्याची त्यांना अनेकदा कमतरता असते.

दृष्टी
एक आदर्श समाज घडविणे.
ध्येय
शिक्षणाचा पाया भक्कम करून व त्याला कौशल्य विकास व इतर गोष्टींची जोड देत मुलींना त्यांच्या आयुष्याच्या सर्वोच्च स्थानी घेऊन जाणे व त्यांच्या द्वारे आदर्श समाज घडवणे हेच आशा फाऊंडेशन, नवी मुंबई चे ध्येय आहे.
उद्दिष्ट
'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांच्या द्वितीय जन्म शताब्दी पर्यंत म्हणजेच ३ जानेवारी २०३१ पर्यंत महाराष्ट्रातल्या २ लाख एकल पालक व अनाथ मुलींपर्यंत पोहचणे हे 'आशा फाऊंडेशन' चे उद्दिष्ट आहे.
आमची मूळ मूल्ये
आत्मविश्वास
प्रत्येक मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे.
स्वतंत्र व्यक्तिमत्व
स्वतंत्र व्यक्तिमत्वातून मुलींना सक्षम करणे.
सर्वांगीण विकास
मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे.
आत्मनिर्भर
स्वावलंबी जीवनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे.
सक्षमीकरण
वाढीसाठी साधने आणि संधी उपलब्ध करून देणे.

प्रथम सेवक
श्री. दत्तात्रय जगताप
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक
श्री. दत्तात्रय जगताप यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील 'लोणंद' येथे झाला. लहानपणापासून शिक्षणाला प्राधान्य देऊन शालेय शिक्षण गावामध्ये पूर्ण करून उच्च शिक्षण पुण्यामध्ये केले. लहानपणीच आई व वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांचा सांभाळ आजी व मावशी नी केला. अनेक वेदना, हालअपेष्टा सहन करून आलेल्या संकटावर 'स्वार' होऊन जिद्द, चिकाटी व कष्टाच्या बळावर सचोटी व नीतीने व्यवसाय करत समाजासाठी उत्तम कार्य करायचे हेच ध्येय उराशी बाळगले. या कठीण परिस्थितीतूनच त्यांनी आयुष्याची खरी जाणीव घेतली. “आधार नसलेल्या मुलांचे आयुष्य किती कठीण असते.”
शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी स्वतःचे उच्च शिक्षण पूर्ण केले आणि नंतर उद्योगविश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले. व्यवसायात उत्तम यश मिळवले, पण त्यांच्या मनात नेहमीच एक प्रश्न होता. “आपण समाजासाठी काय करतो आहोत?”
याच विचारातून “आशा फाउंडेशन, नवी मुंबई” ची स्थापना झाली. त्यांचा उद्देश फक्त मदत देणे नव्हता, तर अशा मुलींना सक्षम बनवणे होता ज्या लहान वयातच पालकांच्या आधारापासून दूर राहिल्या आहेत. आज ते हजारो मुलींसाठी केवळ संस्थापक नाहीत, तर एक मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि पाठीशी उभा असलेला आधार आहेत.
त्यांचा ठाम विश्वास आहे. “एक मुलगी सक्षम झाली, की ती संपूर्ण कुटुंब आणि समाज बदलू शकते.” हीच विचारधारा आशा फाउंडेशन, नवी मुंबईच्या प्रत्येक उपक्रमामध्ये दिसून येते.
प्रथम सेवक
सौ. रूपाली जगताप
सहसंस्थापक व संचालक
आशा फाउंडेशन, नवी मुंबईच्या कार्याला भावनिक आणि व्यवस्थापनात्मक बळ देणारी व्यक्ती म्हणजे सौ. रूपाली जगताप. त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुटुंबाची जबाबदारी सांभाळत, समाजकार्यालाही तितक्याच समर्पणाने पुढे नेले आहे.
संस्थेच्या संचालिका म्हणून त्या प्रत्येक उपक्रमामध्ये सक्रियपणे सहभागी होतात. मुलींच्या गरजा, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या भावना समजून घेण्याची त्यांची क्षमता ही फाउंडेशनची मोठी ताकद आहे. त्या फक्त नियोजन करत नाहीत, तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वतः उपस्थित राहून कामाची अंमलबजावणी देखील पाहतात.
फाउंडेशनमधील प्रत्येक मुलीसाठी त्या केवळ एक पदाधिकारी नाहीत, तर आईसारखी काळजी घेणारी व्यक्ती आहेत. मुलींच्या आत्मविश्वासात वाढ व्हावी, त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा आणि आयुष्यात पुढे जावे, यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.


अभिनेता, निर्माता व व्यावसायिक
श्री अमोल भोसले
संचालक
श्री अमोल भोसले हे प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व व्यावसायिक आहेत. लहानपणापासून वाट्याला आलेल्या संघर्षावर मात करून अभिनय क्षेत्रात स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर उत्कृष्ट छाप सोडून आज ते अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच पुण्यामध्ये उत्तम व्यवसायिक म्हणून कार्यरत आहेत. श्री. अमोल भोसले हे श्री. दत्तात्रय जगताप यांचे परममित्र, सखा, सोबती व सारथी आहेत. आशा फाउंडेशनच्या स्थापनेपासून त्यांनी नेहमीच एका मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे.
आशा फाउंडेशनच्या स्थापनेपासून प्रत्येक कार्यामध्ये तसेच आशा फाउंडेशनच्या विस्तारामध्ये त्यांची मोलाची भूमिका आहे. संचालक म्हणून त्यांनी आशा फाउंडेशनच्या विस्तारावर भर देऊन अधिकाधिक सावित्रीच्या लेकींना उत्कृष्ट सेवा कशी देता येईल हा प्रयत्न ते सातत्याने करतात.